24.4 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमुख्य बातम्याअमेरिकेतील सरकारी कर्मचा-यांना नारळ!

अमेरिकेतील सरकारी कर्मचा-यांना नारळ!

२००० जणांची रातोरात हकालपट्टी; अन्य हजारो कर्मचारी सक्तीच्या सुटीवर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी काही सरकारी कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे, तसेच हजारो कर्मचा-यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्याचे आदेश जारी केले आहेत.

आताचे हे कर्मचारी ‘यूएसएआयडी’ अर्थात युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे आहेत. २००० कर्मचा-यांना रातोरात नारळ देण्यात आला आहे. एका संघीय न्यायाधीशाने प्रशासनाला ‘यूएसएआयडी’च्या कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी दिली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्याची कर्मचा-यांची विनंती न्यायाधीश कार्ल निकोल्स यांनी फेटाळून लावली.

यानंतर लगेचच वेळ न दवडता ट्रम्प यांनी अधिसूचना जारी केली. मिशन-आधारित आवश्यक कार्ये, प्रमुख नेतृत्व आणि विशेषत: नियुक्त केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेले कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत. ‘यूएसएआयडी’चे वॉशिंग्टन मुख्यालय बंद करण्यात आले होते. जागतिक स्तरावर हजारो मदत आणि विकास कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत.

या मोहिमेद्वारे परदेशात असलेल्या लोकांना आता धक्का बसला आहे. परदेशात तैनात कर्मचा-यांना आपत्कालीन संपर्क सुविधा पुरवल्या जाणार आहेत. टू-वे रेडिओ आणि पॅनिक बटण सुविधा असलेले मोबाइल अ‍ॅप उपलब्ध असणार असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच लाखभर कर्मचा-यांना नारळ दिला असून उर्वरित कर्मचा-यांची उपयुक्तता तपासण्यात येत आहे. यासाठी त्यांची लाय डिटेक्टर चाचणी घेतली जाणार आहे. सरकारच्या गोपनिय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा केल्या असतील या संशयातून ट्रम्प सरकार या लाखो कर्मचा-यांची लाय डिटेक्टर टेस्ट करणार आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सरकारी गोपनिय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचविण्यासाठी कर्मचा-यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR