लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील एमआयडीसी येथील विवेकानंद शैक्षणिक संकुल व राजमाता जिजाऊ वस्तीगृहात इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या अरविंद राजाभाऊ खोपे विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी अरविंद खोसेचे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांना तपासासंदर्भाने अरविंदच्या नातेवाईकासह समाजबांधवांनी संशय व्यक्त करुन काही मागण्या केलेल्या होत्या. परंतू, त्याकडेही जाणिवपूर्वक दूर्लक्ष झाल्याने दि. २८ ऑगस्ट रोजी युथ पँथर संघटनेच्या वतीने येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर ‘जवाब दो’ आंदोलनाचा एक भाग म्हणून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी संस्थेतच संशयास्पद मृत्यू झाला.
या प्रकरणी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघांना ताब्यातही घेण्यात आलेले आहे. परंतू, अरविंदचा शवविच्छेदन अहवाल संभ्रमात टाकणारा
आहे, असा आरोप करीत युथ पँथर संघटनेच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संतोष वाघमारे, सिद्धार्थ कवठेकर, प्रताप कांबळे, विदेश सोमवंशी, धनराज कांबळे, भैय्या वाघमारे, गोविंद कांबळे, विकास कांबळे, राहुल गायकवाड, गौरव सोनवणे, भोला वाघमारे, यशपाल कांबळे, अरविंदचे नातेवाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.