लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजनांतूून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असून शैक्षणिकसह इतरही काही प्रश्न सोडविण्याकरीता आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या प्रश्नांचा समावेश करुन ते प्रश्नही प्राधान्यांने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकातील शादीखान्याचा लोकार्पण सोहळा दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार सुरेश जेथलिया, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चाँदपाशा इनामदार, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, अॅड. समद पटेल, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक अहेमदखा पठाण, युनूस मोमीन, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, आसिफ बागवान, लातूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त खानसोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शादीखाना हा लातूरच्या सर्वांगीण विकासात भर घालणारा अतिश्य सुंदर प्रकल्प आहे, असे नमुद करुन माजी मंत्री अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी या शादीखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी प्र्रयत्नपूर्वक शादीखाना पूर्ण केला. आमची नियत स्वच्छ आहे. त्यामुळेच आम्ही हाती घेतलेला शादीखाना पूर्ण केला. विरोधाकांचा शादीखाना अद्यापही अपुर्णच आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे हा शादीखानाही पूर्ण करु. अल्पसंख्यांकांचे शैक्षणिकसह इतरही काही प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्नांचा विधानसभेच्या निवडणुक जाहीरनाम्यात समावेश करुन ते सर्व प्रश्न सोडवू.
महाविकास आघाडीने अल्पसंख्यांकांना विधानसभेच्या निवडणुकीत प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, जिथे अल्पसंख्यांक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तिथून प्रतिनिधीत्व दिले जाईल. विधानसभेच्या निवडणुकीत मतविभाजनाचा प्रयत्न सुरु आहे. अल्पसंख्यांकांनी सावध होण्याची वेळ आहे. लोकभसेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळेच महाविकास आघाडीला मोठे यश मिळवता आले. आता विधानसभेच्या निवडणुकीतही अल्पसंख्यांकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी लोकसभेतील यशाबद्दल अल्पसंख्याकांचे आभार मानले. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच अल्पसंख्यांक समाजाने महाविकास आघाडीला बळ द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी मोईज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना अल्पसंख्यांकांचे शैक्षणिकसह इतर प्रश्न मांडले. ते प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली. प्रास्ताविक अल्पसंख्यांक काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. फारुक शेख यांनी केले. यावेळी अजिज बागवान, सिकंदर पटेल, वहीद शेख, कलीम शेख, अॅड. देविदास बोरुळे-पाटील, करीम तांबोळी, तब्रेज तांबोळी, अविनाश बट्टेवार, युसूफ बाटलीवाले यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत सत्तार शेख, अॅड. समद पटेल, इम्रान सय्यद, युनूस मोमीन, विजयकुमार साबदे, आयुब मणियार, रईस टाके यांनी केले.