वाशिम : गावात अवैध दारूविक्रीचा धंदा वाढत चालला आहे. यामुळे गावात तंटे वाढले असून दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. अनेकदा मागणी केल्यानंतर देखील दारूबंदी होत असल्याने अखेर आज महिलांनी गावातील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाशिमच्या वारला, टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारूविक्री करण्यात येत असते. टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा गावात अवैध दारूविक्रेत्यांनी नुसता धुमाकूळ घातला असून अवैध दारूविक्रीमुळे कित्येक महिलांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. गावात देखील वाद वाढलेले पाहण्यास मिळत आहेत. यामुळे अनेक दिवसांपासून दारूबंदी करण्याची मागणी करण्यात येत होती.
तीव्र आंदोलनाचा इशारा
गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी वज्रदेही महिला विकास संघाच्या महिलांनी थेट वारला गावातील पाण्याच्या टाकीवर चढून पोलिस प्रशासनाच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन केले. महिलांनी पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. दारूबंदी करा अन्यथा त्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला.