लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात दि. ११ मार्च रोजी सायंकाळी मद्यधुंद टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीना अटक केली आहे. पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता समाधानकारक असली तरी असे प्रकार घडूच नयेत यासाठी दक्षता घेणे आता आवश्यक बनले असल्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
सामाजिक, धार्मिक सलोखा राखून कायम शांत राहणारे शहर म्हणून लातूरचा राज्यात आणि देशात लौकिक आहे. त्यामुळेच शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात या शहराची प्रगती होत राहिली आहे, अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांमुळे या लौकिकाला धक्का पोहोचत आहे, त्यामुळे लातूर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लातूर जिल्हा व पोलीस प्रशासनाने उत्तम राखावी, अशा सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत दिल्या होत्या.
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात काल भर रस्त्यावर एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हापासून या संपूर्ण घटनाक्रमावर आपण लक्ष ठेवून होतो शिवाय कायदा मोडणा-यावर कडक कार्यवाही तात्काळ कार्यवाही केली जावी अशा सुचना जिल्हा पोलीस यंत्रणेला दिल्या होत्या, असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लातूरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी येथील शांतता भंग पावणार नाही याची दक्षता घेतली जावी, आगामी काळात लातूर शहर आणि जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, व्यवसाय चालणार नाहीत, तसा कोणी प्रयत्न जरी केला तरी त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सुचनाही यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सबंधित वरीष्ठ अधिकारी यांना दिल्या आहेत. लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजेभोसले यांच्याशी नियोजन समिती बैठकीदरम्यान जिल्ह्यातील कायदासुव्यवस्था या संदर्भात आपण बोललो होतो या संदर्भाने आणखीन त्यांची स्वतंत्र भेट घेऊन आपण बोलणार असल्याचे माजी मंत्री आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.