वाशिम : मुक्या जनावरांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरकडून येणा-या वाशिमच्या कारंजा येथील टोल प्लाझावर हा प्रकार उघडकीस आला असून कारंजा पोलिसांमुळे ट्रकमध्ये कोंबून वाहतूक केल्या जाणा-या २७ बैलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र यात चार बैलांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने येणा-या ट्रकमध्ये ३१ बैल निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात होती. दरम्यान ट्रक कारंजा येथील टोल प्लाझावर आला असता पोलिसांनी मध्य प्रदेशचा क्रमांक असलेल्या या ट्रकला तपासणी करण्याकरता थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचा ट्रक टोल नाक्याचा दांडा तोडून कारंजा शहराकडे भरधाव वेगाने घेऊन मार्गस्थ झाला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.
कारंजा पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावर जाऊन ट्रक पुढे थांबवून तपासणी केली. त्यात ३१ बैल निर्दयतेने कोंबलेले दिसून आले. दरम्यान यात ४ बैल मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी कारंजा पोलिसांनी संशयित आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख ६५ हजार किमतीचे बैल असा एकूण १४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.