परभणी : अॅग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पिक लागवड हे दोन्ही बाबी शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान जर्मनी, जपान, इटली या प्रगत देशात प्रचलित होत आहे. भारतात मोठया प्रमाणात सौर ऊर्जा निर्मितीस वाव असुन संशोधनाच्या माध्यमातुन कोणते पीक अॅग्रीपीव्ही तंत्रज्ञानात किफायतीशीर राहील हा मुळ उद्देश जीआयझेड आणि परभणी कृषी विद्यापीठ संयुक्त संशोधन प्रकल्पाचा आहे. अॅग्रीपीव्ही हे पर्यावरण पुरक तंत्रज्ञान असुन यात शेतजमीनीचा कार्यक्षम वापर करून हरित ऊर्जा निर्मिती शक्य होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी केले आहे.
जर्मन एजन्सी जीआय झेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने अॅग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ अॅग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीआयझेडच्या इंडो जर्मन एनर्जी फोरमचे संचालक टोबीयास वीन्टर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञा डॉ. रेणु खन्ना चोप्रा, नॅशनल सोलार एनर्जी, फेडरेशन ऑफ इंडियाचे मोनू बिश्नोई होते.
याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव पी. के. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभामध्ये जीआयझेड या संस्थेद्वारे मोठी गुंतवणूक करून उभारण्यात आलेले संशोधन साहित्य व उपकरणे विद्यापीठास कराराद्वारे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आले. यामुळे विद्यापीठाद्वारे अॅग्री-फोटोव्होल्टेईक हा प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.