जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील अनेक बागायतदार शेतक-यांचा आंबा लागवडीकडे कल दिसून येत आहे. पूर्वी नागरिकांना गावरान आंब्याची चव चाखायला मिळायची परंतु आता याची जागा केशर आंब्यांनी घेतली आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याला मोहर लागला असून याचा सुगंध शिवारात दरवळू लागला आहे. सध्याचा आंब्याला आलेला मोहर पाहता यंदा तालुक्यात आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत .
सद्यस्थितीत गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे, शेंद्री, गोटी, खोब-या, गोड्या, केळ्या, अशा नावाने पूर्वी गावरान आंबे प्रसिद्ध असायचे, आंब्याच्या चवीनुसार तसेच आकारानुसार व रंगानुसार त्यांना नावे पडलेली होती. पूर्वी गावरान आंब्याची आमराई असायची, एकाच ठिकाणी शंभरच्यावर झाडे असायचे परंतु गत दहा वर्षांमध्ये पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे तसेच विविध असे रोग पडल्यामुळे, अनेक गावरान आंब्याची झाडे उभ्याने वाळून गेली. आता गावरान आंब्याची जागा केशरी आंब्याने घेतली आहे. अनेक शेतकरी आता फळबागेकडे वळले आहेत. तालुक्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केशर आंब्याची बाग डोलत आहे . यामधून शेतक-यांनाही चांगले उत्पादन मिळत आहे.