पुणे : प्रतिनिधी
पुण्यामध्ये अत्यंत आवश्यकता असलेल्यांना नवीन शस्त्र परवाना दिले जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना परवाना देणार नाही. आमच्यावर कुणाचा दबाव नाही. लोकांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे.आका, काका कोणालाही सोडणार नाही, सात पिढ्या लक्षात राहील असा धडा शिकवणार’, असा सज्जड दम पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्या वाल्यांना त्रास देतात, धमक्या देतात. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. पोलिस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही. त्यांना सात पिढ्या लक्षात राहील, असा धडा शिकवू, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात बोलताना अमितेश कुमार म्हणाले, संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. पुण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यामध्ये ३४ टक्के घट झाली आहे. या आकडेवारी आम्ही समाधानी नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.
वाहन तोडफोड किंवा चेन स्रॅचिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटले.