पुणे : प्रतिनिधी
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून राज्याच्या विविध जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आगामी दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुणे शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
यंदा परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात झाली असून सध्या तो राजस्थान आणि गुजरातमध्ये असून नजीकच्या काळात त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण भागातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे तसेच आगामी तीन दिवस काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असून सखल भागात पाणी साचले आहे. मात्र या पावसामुळे गेले काही दिवस जाणवत असणारा वातावरणातला उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे.