लातूर : प्रतिनिधी
येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे मंजूर असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करावे यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले असून, मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी वर्षात हे महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजे सण २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारच्या बैठकीत घेतला घेतला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आह. या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरच्या शैक्षणिक सुविधेमध्ये भर पडली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या सुविधेमुळे आता लातूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे, असे नमूद करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.