नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या जेलरोड परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे राहणा-या एका निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. इतकेच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर वृद्धापकाळात एकटेपणात जीवन जगणा-या दाम्पत्यांच्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
नाशिकच्या जेलरोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (७६) आणि पत्नी लता जोशी एकत्र राहत होते. लता जोशी यादेखील शिक्षक होत्या. त्यांची दोन्ही मुलं मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यामुळे नाशिकच्या घरात हे दोघेच राहत होते. लता जोशी यांना २०१७ पासून मेंदू विकाराचा त्रास होता. या आजारामुळे त्या एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या आजारपणामुळे दाम्पत्य कंटाळले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच आजारपणातून मुरलीधर जोशी यांनी आधी पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे असे म्हटले आहे. याशिवाय आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही असेही चिठ्ठीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आजारपणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. दाम्पत्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.