नांदेड: प्रतिनिधी
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या देगलूर नाका येथील टायर बोर्ड परिसरातून जवळपास २४.६१ किलो गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी पोेलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. हा गांजा ४ लाख ९२ हजार रुपयाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देगलूर नाका परिसरातील टायर बोर्ड भागात गांजा विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला दि.२६ रोजी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून देगलूर नाका परिसरातील टायर बोर्ड परिसरात पाळत ठेवली. टायर बोर्ड परिसरातील अहेमदखान पि.अन्वरखान (वय २८) इसमाच्या घरी हा गांजा गाठीमध्ये पॅक करून साठवण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाड टाकून त्या इसमाजवळील गांजा ताब्यात घेतला आहे. सदर गांजा हा २४.६१ किलो असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ४ लाख ९२ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईसाठी तहसीलदारांना याची माहिती देण्यात आली. तहसीलदारांच्या पथकाकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी दुपारपर्यंत महसूलचे पथक चौकशी करीत होते. हा गांजा कुठून आला व तो कुठे नेण्यात येणार होता याची माहिती या प्रकरणातील आरोपींकडून घेण्यात येत आहे. देगलूर नाका परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.