महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी
मंत्र्यांपाठोपाठ आता अधिका-यांनाही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिका-यांनी दर आठवड्याला गाव भेटी द्या. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सदर भेटीदरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे का, याची सकारात्मक खातरजमा करावी. औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील, असे नियोजन करावे व दौ-यामध्ये सकारात्मक फलित निघेल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
गौण खनिज व महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे. तसेच, वाळू व गौण खनिज उत्पन्न तपासणी शासकीय धोरणानुसार अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा क्षेत्रीय भेटीदरम्यान करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ११ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
गावपातळीवर सुसंवाद हवा
ग्रामपातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत. संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे, याबाबत जनसंवादातून खात्री करावी.