35.1 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरआद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलन उद्या

आद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलन उद्या

लातूर : प्रतिनिधी
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे येथील राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ५ फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज साहित्य नगरीत राज्यस्तरीय पहिले आद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून मराठीतील ज्येष्ठ व श्रेष्ठ कादंबरीकार  विश्वास पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव पाटील स्वागताध्यक्ष आहेत.
संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, अ‍ॅड. सुनील सोनवणे, सर्व संस्थाचालक,  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरु मधुकर गायकवाड, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर, डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, निमंत्रितांचे कविसंमेलन, युवा मंचचे काव्यसंमेलन, कथाकथन, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमाची साहित्य मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.
ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते, समीक्षक डॉ. पृथ्वीराज तौर नांदेड, प्रा. भास्कर बडे, श्री. विलास सिंदगीकर, डॉ. महेश खरात छत्रपती संभाजीनगर, डॉ. बालाजी मदन इंगळे, उमरगा, डॉ. वैशाली गोस्वामी, नांदेड, डॉ. जयद्रथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनात निवडक १७ कवींच्या बहरदार कवितांचे सादरीकरण होणार आहे. अभिजात मराठी भाषेवर एक महत्त्वाचा परिसंवाद या संमेलनात समाविष्ठ करण्यात आला आहे. संमेलनाच्या प्रारंभी ग्रंथदिंडीचे आयोजन केले असून वारकरी दिंडी,
 तुळस दिंडी, कलश दिंडी, पर्यावरण दिंडी, प्रबोधन दिंडीसह विविध १५ दिंड्यांचा ३५० विद्यार्थ्यांचा समावेश असलेला संघ, महाविद्यालयीन प्राध्यापक, साहित्यिक, रसिक श्रोते दिंडीत सहभागी असणार आहेत. प्रथमच महाविद्यालयाने साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध ११ समित्यांचे गठन करण्यात आले आहे.   या संमेलनास उपस्थित राहून साहित्यकलेचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, डॉ. अभिजीत यादव, संमेलन कार्यवाहक तथा मराठी विभागप्रमुख डॉ. संभाजी पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR