नगर: प्रतिनिधी
नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी महायुतीचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. आम्ही जिगरबाज खेळाडू, निवडणुकीत तर हरवले आहेच.
आता कोर्टातही हरवू, अशा शब्दांत लंके यांनी विखे-पाटील यांच्या न्यायालयीन लढ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या डॉ. सुजय विखे-पाटील यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विखे-पाटील यांनी लंके यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर लंके यांनी प्रतिक्रिया दिली.
निवडणूक झाली, विरोध संपला. विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ ही आपली भूमिका आहे. पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणुकीत हरवलेले आहेच, आता कोर्टातही तेच होईल, असे खासदार लंके यांनी म्हणाले.
लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडतात. यात कुणाचा तरी पराभव होणार हे निश्चित आहे. पण आपला पराभवच होऊ शकत नाही, अशी मानसिकता बाळगणे ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे.
या मानसिकतेतूनच पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात जाताना दिसताहेत. अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करुन दिलेले मार्ग आहेत. हे मार्ग तपासून जर त्यांना मन:शांती लाभत असेल, तर त्यांना ते करु द्या. आपली बाजू सत्याची आहे. सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावेत. ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करताहेत, पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत, असा जोरदार टोला लंके यांनी विखे-पाटील यांना लगावला आहे.