परभणी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले आहे त्यांनी या कर्जाच्या माध्यमातून आपला व्यवसाय, उद्योग सचोटीने उभारावा. जिद्द, परिश्रमाच्या जोरावर या व्यवसाय, उद्योगाचे वटवृक्षात रूपांतर करावे. आपल्या व्यवसाय, उद्योगाच्या माध्यमातून स्वत:सह इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा असे शहरातील कर सल्लागार दिपक जपे यांनी केले.
मिटकॉन प्रशिक्षण संस्थेमार्फत दि.२ रोजी कस्तुरी लॉज येथे मिटकॉनचे समन्वयक श्रीकांत मानोलीकर यांच्या पुढाकारातून नवीन व्यवसायीक, उद्योजक यांच्यासाठी आयकर व वस्तू व सेवाकर कायदा या विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर सल्लागार दिपक जपे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना कर सल्लागार जपे म्हणाले की, व्यवसाय, उद्योग करत असताना आयकर व वस्तू व सेवाकर कायद्याचे शासन नियमाप्रमाणे पालन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. नव उद्योजक, व्यवसायीक यांनी नवीन कल्पनांची जोड देवून आपल्या व्यवसाय, उद्योगाची भरभराट करावी असे आवाहन कर सल्लागार जपे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास नव व्यावसायिक व उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.