अमरावती : प्रतिनिधी
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
आता रवी रणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मंत्रिपद न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे, अशा भावना त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अमरावती जिल्ह्यात भरघोस यश मिळाल्याचे दिसून आले. या यशात आमदार रवी राणा यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे मागील वेळेस हुकलेले मंत्रिपद किमान यंदा तरी आपल्याला मिळेल, या आशेवर बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा होते.
मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होता थेट अमरावतीला दाखल झाले होते. तर रवी राणा यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जिंदगी है लडाई जारी है…, अशा आशयाचा व्हीडीओ शेअर केला होता. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.