सोलापूर :
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकमंगल फाउंडेशनच्या संचालकांनी व त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
आमदार सुभाष देशमुख वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्यांनी वाढदिवसादिवशी बुके, गुच्छ न आणता त्याऐवजी निराधारांसाठी चालवल्या जाणाऱ्या लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिवसभर आपल्या विकास नगर येथील कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. आपल्या लाडक्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या पद्धतीने लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला सहकार्य केले. काहींनी गहू तर काहींनी तांदूळ दिले, काहींनी तेल तर काहींनी गोरगरीब पाण्यात मुलांना शालेय साहित्यांची भेट दिली.
आमदार सुभाष देशमुख यांचा ६७ वा वाढदिवस असल्याने सुरुवातीला त्यांचे ६७ दिव्यांनी औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यात आली. तसेच सर्व लाभार्थ्यांना गोड भोजन देण्यात आले. यावेळी अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
आपल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहून आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले