नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील सर्व मटन व्यावसायिकांनी हलाल पद्धतीचे मटन विकले जाईल, झटका पद्धतीचे मटन आम्ही कोणीही विकणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘आम्ही जन्मजात खाटीक आहोत. खाटीक व्यवसाय आमचा आजचा नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीपासूनचा आहे, त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट देणारे नीतेश राणे कोण? असा सवालही नाशिकच्या हिंदू खाटीक समाजातील मटन विक्रेत्यांनी केला आहे.
राज्याचे मत्स्य, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी मटन विक्रीसंदर्भात एक नियमावली तयार केली आहे. त्यात झटका पद्धतीने मटन विकणा-यास मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजाची शुक्रवारी बैठक झाली. त्या बैठकीत हलाल पद्धतीचे मटन विकले जाईल, झटका पद्धतीचे मटन कोणीही विकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदू खाटीक समाजाचे नेते म्हणाले, झटका पद्धत आम्हाला चालत नाही, ती पद्धत आम्हाला मान्य नाही. आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, आम्ही जन्मजात खाटीक आहोत. नीतेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणारे? खाटीक व्यवसाय आमचा आजचा नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीपासूनचा आहे. आम्ही आमच्या व्यवसायाची मोट का बदलायची. कोणीही येऊन आम्हाला सांगेल की, अशा पद्धतीने धंदा करा आणि हिंदू आणि मुस्लिम करेल.
मुळात कोणत्याही व्यवसायात जात, पात, धर्म, पंथ नसतो. ग्राहक हाच आमचा देव आहे, त्याला पाहिजे ते आम्ही हलाल पद्धतीनेच देणार. आम्ही कोणाचंही ऐकायला मजबूर नाही. संविधानाने आम्हाला खायचा, प्यायचा आणि विकण्याचा जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे आम्ही चालणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आम्हाला मल्हार सर्टिफिकेशन देणारे नीतेश राणे कोण? आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याचा काय अधिकार आहे? आम्ही जन्मजात खाटीक आहोत. आम्हाला कोणाच्याही शिक्क्याची गरज नाही. आमचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालेला आहे. नीतेश राणे कोण आम्हाला सांगणार?, तुम्हाला सर्टिफिकेट देणार म्हणून?
राज्यात हलाल पद्धतीचे मटन विकले जाते. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात काही ठराविक पॉकिटमध्येच झटका पद्धतीचे मटन विकले जाते. पण हिंदुस्थानात बहुतांश ठिकाणी हलाल पद्धतीचेच मटन विकले जाते. कारण झटका पद्धतीचे मटन आपल्याकडे चालतच नाही. शास्त्रीय दृष्टीनेसुद्धा झटका मटन अयोग्य आहे. विजेच्या करंटमुळे त्या प्राण्याच्या नसा गोठल्या जातात. त्यामुळे रक्त प्रवाहीत न होता, ते गोठले जाते. त्यातून विषबाधा होऊ शकते. आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ते तुम्ही झटकामधून खाता. हलाल पद्धतीमध्ये त्या सर्व गोष्टींचा निचरा होतो. स्वच्छ केले जाते, असा दावाही त्यांनी केला.
आमच्या धंद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न
डोक्यात धार्मिक विषय घेऊन आमच्या धंद्याला बदनाम केलं जात आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देताना त्यांनी हा निर्णय नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील हिंदू खाटीक समाजाचे लोक पाळतील, असा विश्वासही नाशिकमधील हिंदू खाटीक समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला.