33.7 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘आयएमएफ’चे कर्ज मिळूनही पाकिस्तानचा पाय खोलातच!

‘आयएमएफ’चे कर्ज मिळूनही पाकिस्तानचा पाय खोलातच!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्स रकमेचे नवे कर्ज मिळाले असले, तरी आर्थिक अनागोंदी आणि पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार यामुळे पाकची स्थिती सुधारणे अत्यंत कठीण मानले जात आहे. विशेष म्हणजे १९५८ पासून पाकिस्तानने एकूण २४ वेळा आयएमएफचे दरवाजे ठोठावले आहेत.

२०२५ ते २०२७ दरम्यान पाकिस्तानवर १३० अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्याचा दबाव आहे. येत्या दोन वर्षांत पाकिस्तानला आयएमएफ, इतर जागतिक संस्था आणि बँकांना ही अवाढव्य रक्कम परत करावी लागणार आहे. धर्ममार्तंडांचा व्यवस्थेतील हस्तक्षेप, तेहतीस वर्षांची लष्करी राजवट, आर्थिक घडामोडींवर लष्कराची असलेली मजबूत पकड आणि कुडमुडी लोकशाही या प्रमुख कारणांस्तव १९४७ मध्ये स्थापनेपासून पाकिस्तानला सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

१९४७, १९६५ आणि १९७१ मधील भारतासोबतची युद्धे, बांगला देशचे वेगळे होणे, अंतर्गत राजकीय अस्थिरता यातून पाकची दुरावस्था होत गेली. परिणामी त्या देशाला १९५८ मध्ये पहिले नाणेनिधीकडून पहिल्यांदा मोठे कर्ज मिळाले. तेव्हापासून २०२४ पर्यंत, दर तिस-या वर्षी पाकने सरासरी एक नवे कर्ज घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर, भारताकडील राखीव निधी ५६९.५४ अब्ज डॉलर असून, शेजारील बांगला देशाकडे हाच निधी ४६.१७ अब्ज डॉलर, अफगाणिस्तानकडे ९.७५ अब्ज डॉलर, तर श्रीलंकेकडे ६.०५ अब्ज डॉलर्सचा राखीव निधी आहे.

कर्ज देताना अनेक जाचक अटी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपव्यवस्थापकीय संचालक निगेल क्लार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत पाकिस्तानातील सरकार सुधारणांसाठी वचनबद्ध आहे तोपर्यंत त्या देशाला दिलेले कर्ज शाश्वत मानले जाऊ शकते. मात्र, धोरणे फसली किंवा बा निधी थांबला तर चलन संकट आणखी गडद होणे निश्चित आहे. यावेळी नाणेनिधीने पाकला कर्ज मंजूर करताना कर-सुधारणा, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि सरकारी खर्चाचे व्यवस्थापन यावर विशेष भर दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR