कोलकाता : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या नव्या हंगामाची सुरुवात शनिवार, दि. २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या सोहळ््यात बॉलिवूड स्टारचा रंगारंग कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. अर्थात, दिशा पाटणीचे ठुमके आणि श्रेया घोषालच्या आवाजाची जादू या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली म्हणाले की, आयपीएलचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळा रंगणार आहे. हा सोहळा ३५ मिनिटे चालणार आहे. नाणेफेकीपूर्वी हा कार्यक्रम सुरू होईल. परंतु पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे बॉलिवूड स्टारचा रंगारंग कार्यक्रमही कसा रंगतो, हे पाहावे लागेल. या सोबतच सामन्यावरही पावसाचे सावट असल्याने पहिलाच सामना कसा रंगतो, याकडेही क्रिकेट प्रेमींचे लक्ष असेल. यासंदर्भात सौरभ गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आम्हाला उद्घाटन समारंभासाठी ३५ मिनिटे दिली आहेत. या काळात आपल्याला दरवर्षीप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम आयोजित करावा लागेल, असे म्हटले.
आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे यावेळी केकेआरचे नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार याच्याकडे आहे. गेल्या हंगामात केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेतेपद पटकावले होते. रहाणेसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान आहे तर पाटीदारकडे आयपीएल जेतेपद पटकावण्याची संधी आहे. बंगळुरू संघाने कधीही आयपीएल जिंकलेले नाही. त्यामुळे पाटीदार संघाला फ्रँचायझीला पहिले विजेतेपद मिळवून देण्याची संधी असेल. केकेआर आणि आरसीबी यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल आणि टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
सायंकाळी रंगणार
रंगारंग सोहळा
आयपीएल २०२५ चा उद्घाटन समारंभ शनिवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. या उद्घाटन सोहळ््यात प्रसिद्ध बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल, पंजाबी गायक करण औजला आणि बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत हा रंगारंग सोहळा रंगणार आहे.