पुणे : प्रतिनिधी
राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीनंतरची आयोगाची पहिली बैठक बुधवारी (दि.२७) पुण्यात झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तयार करण्यात आलेल्या सर्वेक्षण प्रश्नावलीतील अंतिम निकषांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत निकष निश्िचतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या ४ जानेवारीला पुन्हा बैठक आयोजित करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगातील वरिष्ठ अधिका-यांकडून सांगण्यात आले.
या आयोगाचे याआधीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी १२ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राज्य सरकारने तात्काळ मंजूर करीत त्याच दिवशी रात्री उशिरा मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रे यांच्या नियुक्तीबरोबरच रिक्त झालेल्या तीन सदस्यांच्या जागाही नव्याने भरण्यात आल्या होत्या. या नव्या नियुक्त्यानंतरची मागासवर्ग आयोगाची आजची ही पहिलीच बैठक होती.
दरम्यान, मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ६० मुख्य प्रश्नांचा आणि सुमारे दोनशेहून अधिक उपप्रश्नांचा समावेश असलेली २१ पानांची प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीत ए. बी. आणि सी अशा तीन स्वतंत्र मॉड्युल्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी ए मॉड्युलमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मूलभूत माहितीचा, बी मॉड्युलमध्ये कुटुंबविषयक सखोल माहितीचा आणि सी मॉड्युलमध्ये कुटुंबनिहाय आर्थिक स्थितीच्या माहितीचा समावेश करण्यात आलेला आहे.
येत्या आठवड्यात
सर्वेक्षण चाचणीची शक्यता?
मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीनुसार सर्वेक्षणाची नमुना चाचणी (सर्वेक्षण सँम्पल टेस्ट) येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही नमुना चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातील सर्वेक्षण सुरु केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.