सातारा : प्रतिनिधी
जीबीएस आजाराचे रुग्ण आढळत असून या आजाराच्या अनुषंगाने सर्व आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांनी अलर्ट राहून उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा ठेवावा, निवासी वैद्यकीय अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी दिवस-रात्र उपलब्ध राहणे अनिवार्य असून रुग्णांच्या उपचारात कोणत्याही पद्धतीची हलगर्जी सहन केली जाणार नाही, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.
दरम्यान, जीबीएस आजाराबाबत पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.
जीबीएस आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रुग्णस्थिती, करण्यात येणा-या उपाययोजना यांचा आढावा घेतला. जीबीएस आजाराच्या उपाययोजनांबरोबरच प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. या आजाराचा उद्भव प्रामुख्याने दूषित पाणी व दूषित अन्न यामाध्यमातून होत असल्याने दररोज, ग्रामीण व शहरी भागातील पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत.
प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिकेत पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरीन पुरवठा ठेवावा. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये जीबीएसच्या रुग्णांना प्राधान्याने त्वरित उपचार मिळावेत, यासाठी बेड राखीव ठेवावेत. योग्य औषधोपचाराने हा आजार बरा होणार असून याबाबत भीतीचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी मात्र दूषित अन्न व पाणी टाळावे. आजाराबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व नागरिकांनी आजाराबाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.
बेड राखीव ठेवण्याच्या सूचना
जीबीएस आजाराबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ३० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचा-यांना या आजाराबाबत करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे.