पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या तपासादरम्यान राजकीय फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडेचा फोटो असल्याचे चित्र आहे, तर दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलला शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
दत्तात्रय गाडे याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो कटके यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक माहितीनुसार, तो गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी घेऊन जायचा आणि आमदाराचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा, असेही उघड झाले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही आढळले आहे की, दत्तात्रय गाडे हा राजकीय नेत्यांशी आणि काही पोलिस कर्मचा-यांशी संपर्कात होता. त्यामुळे या प्रकरणात त्याला मदत मिळत होती का, याबाबत चौकशी सुरू आहे.
आमदार माऊली कटके यांचे स्पष्टीकरण
आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलला शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना माऊली कटके म्हणाले, मतदार संघांतील १० हजारपेक्षा जास्त लोकांना मी देवदर्शन करून आणले आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा-माझा संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात.
राजकीय फ्लेक्सवर आरोपीचा फोटो
शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो लावण्यात आला आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो आल्याने आरोपी दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.