सोलापूर: पूर्वभागातील तेलुगु भाषिक हे यंत्रमाग आणि विडी उद्योगावर अवलंबून आहे. ७० वर्षात या कष्टकरी वर्गाला पर्यायी उद्योग मिळाला नाही. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी टेक्सटाईल पार्क, आयटी पार्कच्या माध्यमातून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे.
विडी आणि गारमेंट उद्योगातून केवळ आठ महिने हाताला काम मिळते. उर्वरित चार महिने सावकाराकडून कर्ज काढून कुटुंब चालवावे लागते. सावकाराच्या व्याजात घर गहाण ठेवणे आणि प्रसंगी व्यसनाच्या आहारी जाणे हा प्रकार सर्रास दिसून येतो. तेलुगु भाषकांची ही विदारक स्थिती बदलण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत पद्मशाली समाजातील युवकांनी मांडले.
पद्मशाली समाज सोलापूरात लोकसंख्येच्या
दृष्टीने दुसऱ्या स्थानावर आहे. समाजातील नेत्यांनी केवळ स्वतः च्या कायद्यासाठी समाजाचा वापर केल्याने हा समाज मागे राहिला आहे. राजकीय मंडळींमुळे शहरातील सूतमिल बंद पाडल्या. त्यामुळे हा समाज विडी उद्योगाकडे वळाला. संपूर्ण कुटुंबाने विडी उद्योगाला वाहून घेतले तरी कुटुंब चालणे अवघड आहे. शहरात आयटी पार्क उभारले पाहिजे. महिलांना रोजगाराच्या नवीन पर्याय उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जगामातील जनतेपर्यंत शासनाच्या योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे सोलापूर टेक्स्टाईल व्यवसायासाठी अग्रस्थानी असताना गुलर्बग्याला टेक्स्टाईल पार्क झाले.
नवीन उद्योग येण्यासाठी सोलापुरात विमानसेवा असावी आयटी पार्कच्या माध्यमातून उच्चशिक्षित युवकांना सोलापुरात रोजगार उपलब्ध करून द्यावे. नुसतेच शाळेच्या गणवेशावर गारमेंट व्यवसाय अवलंबून न राहता, इतर कामही मिळाले पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनस्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. सोलापुरात उद्योग-व्यवसाय आल्याशिवाय पद्मशाली समाजाची आर्थिक उन्नती अशक्य आहे.
पूर्व भागातील बहुतांश कुटुंब ही महिलांच्या कष्टावर अवलंबून आहेत. हाताला रोजगार नसल्याने पुरुष वर्गामध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय नोकरदारांना जसे प्रसूती काळात मॅटर्निटी रजा मिळते. ती सुविधा या कामगारांनाही मिळाले पाहिजे. नव्याने उद्योग-व्यवसाय वाढीस लागून रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत.
महिलांचे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या सगळ्याचे मूळ केवळ अर्थकारण आहे.पद्यशाली समान कष्टकरी आहे. हातमाग, यंत्रमाग, गारमेंट आणि विडी या उद्योगावर संसाराचा गाडा हाकतात. या समाजाच्या आर्थीक उन्नतीसाठी रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. वर्षातून आठ महिने हाताला काम मिळते आणी चार महिने कर्ज काढून घर चालवितात. व्याज देण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करतात. कर्ज आणि व्याजाच्या चक्रात अनेक घर उद्ध्वस्त झाले आहेत, हे वास्तव आहे. यासाठी शासनास उपाययोजना आवश्यक आहेत.