मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा
पंढरपूर / अपराजित सर्वगोड
भूवैकुंठ पंढरीनगरीत साजरा होणा-या विठुरायाच्या आषाढी एकादशी सोहळ््यासाठी संतांच्या पालखी सोहळ््यासोबत १३ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. भाविक पांडुरंगाची मूर्ती पाहून हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च सुख आहे, अशा भावना व्यक्त करत आहेत.
दिंड्या आणि भगव्या पताकांनी पंढरीनगरी गजबजून आणि विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. रविवारी होणा-या महापूजेसाठी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरीत दाखल झाले. रविवारी पहाटे २:२० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, भाजपचे प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
देवशयनी आषाढी एकादशी सोहळ््यासाठी राज्यभरातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्या शनिवारी वाखरी येथील रिंगण सोहळा पार पडल्यानंतर नगर प्रदक्षिणा करून सायंकाळी पंढरीत विसावल्या. पंढरपूर शहर आणि परिसरासह चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग तसेच ६५ एकर भक्ती सागर परिसर हाउसफुल्ल झाला असून पदस्पर्श दर्शन रांग मंदिरापासून थेट गोपाळपूर येथील इंजीनियरिंग कॉलेजपर्यंत पोचली आहे तर मुखदर्शन रांग प्रथमच गोपाळपूरपर्यंत गेली आहे. सध्या दर्शना रांगेत अडीच लाखाहून अधिक भाविक दाखल झाले.
६५ एकर भक्ती सागर परिसरात तीन लाख भाविकांच्या राहण्याची सोय केली आहे. चंद्रभागा नदिपात्रात स्रानासाठी येणा-या भाविकांच्या संरक्षणासाठी जीवरक्षक बोटी तैनात आहेत. चौका चौकात पोलिसांकडून मदत केंद्र उभारले आहेत. यात्रेकरूंसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५५०० ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे. तसेच ज्या ठिकाणी ४० प्रवासी एकत्रित येतील येथून बस सेवा देण्याचे धोरण ठेवले आहे. पंढरपूर नगरपरिषदेतर्फे १५०० कर्मचा-यांद्वारे स्वच्छता केली जात आहे. ८ हजार पोलिसांचा पंढरीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतले
माऊलींच्या पालखीचे दर्शन
वाखरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. त्यांनी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ््यात सहभाग घेतला. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले. पालखी तळावरील सोयीसुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.