31.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरआसावरी बोधनकर जोशी यांचा ‘वेव्हज‘ या जागतिक मंचावर डंका

आसावरी बोधनकर जोशी यांचा ‘वेव्हज‘ या जागतिक मंचावर डंका

दयानंद महाविद्यालयात सत्कार

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या कन्या आणि दयानंद कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आसावरी बोधनकर जोशी यांचा भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज) शिखर परिषदेत गौरव करण्यात आला. डी.डी. १ या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित झालेल्या सिंफनी ऑफ इंडिया झ्र भारत की गुंज या राष्ट्रीय स्तरावरील रिऍलिटी शोमध्ये त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्टार ऑफ द सिझन अवॉर्ड पटकावला. हा बहुमान मिळवणा-या त्या भारतातील पहिल्या कलाकार ठरल्या आहेत.

आसावरी यांनी दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता ११वीपासून ते एम.ए. (संगीत) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवांबरोबरच त्यांनी अनेक राष्ट्रीय युवक महोत्सवात विविध पारितोषिके मिळवली आहेत. त्यांचा सहभाग सह्याद्री वाहिनी, झी टीव्ही, झी टॉकीज, स्टार प्रवाह आदी वाहिन्यांवरील विविध रिऍलिटी शोंमध्येही उल्लेखनीय राहिला आहे.
या विशेष सन्मानानंतर दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते आसावरी व पती प्रमोद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. प्रदिप सूर्यवंशी, डॉ.अंकुश चव्हाण, डॉ. नितीन डोके, प्रा. सोमनाथ पवार यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थिती होती.

१ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या चार दिवसीय वेव्हज परिषदेत ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याखाली भारताच्या मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तन क्षमतेचे भव्य प्रदर्शन करण्यात आले.
दिनांक १ ते ४ मे या कालावधीत झालेल्या या कार्यक्रमात आसावरी व त्यांच्या समूहाला पाच सादरीकरणांची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, तसेच शाहरुख खान, आमिर खान, रजनीकांत, दीपिका पदुकोण आदी दिग्गज कलावंतांबरोबरच देश विदेशातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितभाई शाह, अरविंद सोनवणे, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, उपप्राचार्य डॉ अंजली जोशी, पर्यवेक्षक डॉ प्रशांत दीक्षित, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. शरद पाडे, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचा-यांनी आसावरी यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR