लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालय लातूरद्वारा प्रस्तूत स्व. प्रा. वसंत कानेटकर लिखीत व प्रा. ज्योतिबा बडे दिग्दर्शित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाच्या कहानीने इतिहासाची पाने उलगडली
बाळांत व्याधीने जन्मदात्या आईचं हरवलेलं छत्र, जिला आई मानलं तीची गैरमर्जी, पितापुत्रात निर्माण केलेला वाद, मंत्री मंडळाच्या मनात जळणारा द्वेष, वतनदारांची फितुरी, आप्तस्वकियांनी केलेलं कटकारस्थान, सत्य, न्याय, निती आणि स्त्रियांची अब्रु यासाठी पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण, स्वार्थानं आंधळ्या झालेल्या दुनियेला नवी दृष्टी देण्यासाठी पत्करलेलं यातनामय बलिदान….असे वेगवेगळे पैलू असलेलं ऐतिहासिक घडामोडींवर आधारित स्व. प्रा. वसंत कानेटकर लिखीत मराठी अजरामर नाटक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची कहानी अर्थात इथे ओशाळला मृत्यू. प्रा. ज्योतिबा बडे(छत्रपती संभाजी महाराज), अॅड. हंसराज साळुंके (औरंगजेब) या दोघांचा अभिनय खूप छान झाला. अमित कठारे (फकरोद्दिन), लखण देवणीकर(आसदखान), योगेश पोटभरे (शेख निजाम), डॉ. भाग्यश्री कुलकर्णी-भोर(महाराणी येसूबाई), अॅड. सुदाम साठे (गणोजी शिर्के), अनंत पोटे (प्रल्हाद निराजी), प्रा. महेश पवार( कवी कलश), आदित्य पवार (संताजी), यश देवणीकर(धनाजी), ज्ञानेश्वर कावळे, आर्यन इंगळे, ओमकार शिंदे(मावळे) या सर्वांच्याच भूमिका तोलामोलाच्या झाल्या. संपूर्ण नाटकाचे सादरीकरण अत्यंत छान झाले.
प्रा. विजय मस्के, रुपेश सूर्यवंशी यांची प्रकाश योजना उत्तम होती. संदेश शिंदे, विनायक राठोड यांचे संगीत संयोजन उठावदार होते. ज्ञानेश्वर कावळे यांचे नैपथ्य अगदी भव्य, दिव्य आणि कलात्मक होते. योगेश पोटभरे यांची वेशभूषा आणि भारत थोरात यांची रंगभूषा अगदी त्या काळात घेऊन जाणारी ठरली.

