पाक सरकारचा धक्कादायक निर्णय
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
सध्या कैदेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग पाकिस्तान सरकारने बांधला आहे. देशविघातक कृत्यांमध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून इम्रान यांच्या पक्षावर बंदी घालण्यात येईल. तसेच इम्रान व त्यांच्या पक्षाच्या दोन वरिष्ठ सहका-यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील, असा धक्कादायक निर्णय पाकिस्तान सरकारने सोमवारी जाहीर केला.
परकीय निधी प्रकरण, ९ मे रोजीची दंगल आणि अमेरिकेत संमत झालेला ठराव, या सा-या बाबींचा विचार करता खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्यासाठी ठोस पुरावे आहेत, यावर आमचा विश्वास असल्याचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधानपदावरून पदच्युत केल्यापासून ७१ वर्षीय इम्रान खान रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर विविध खटले दाखल करण्यात आले आहेत. पीटीआय पक्षावर बंदी घालण्यासह या पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि पक्षाचे माजी अध्यक्ष आरिफ अलवी यांच्यावर द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. जोपर्यंत पीटीआय अस्तित्वात आहे, तोपर्यंत पाकिस्तानला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येणार नाही, असे वक्तव्य तरार यांनी केले. पीटीआयवर बंदी घालावी, यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती तरार यांनी दिली.