अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगभरातील देशांना इशारा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत सत्ता येताच जगाला धक्क्यावर धक्के देणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आणखी एक धक्का दिला असून, जो कोणता देश इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल खरेदी करेल, त्याच्यावर निर्बंध लावण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. भारतावरही त्याचा परिणाम होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करीत इराणकडून तेल खरेदी करणा-या कोणत्याही देशांवर सेकंडरी सॅक्शन लादण्याचा इशारा दिला. त्यानुसार इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल उत्पादने खरेदी करणा-या देशांशी अमेरिकेचा व्यापार थांबवला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. विशेषत: चीन इराणचा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे, यावर या धोरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट इराणच्या अणुकार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि इराण समर्थित दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यापासून रोखणे आहे. या धोरणामुळे इराणच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या चीन हा इराणच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा इशारा चीनकडेच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.