मुंबई : प्रतिनिधी
‘मी पळणारा नाही लढणारा व्यक्ती आहे’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता खासदार संजय राऊतांनी थेट इशारा दिला आहे. ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या, असे आव्हान राऊतांनी फडणवीसांना दिले आहे.
मला सरकारमधून मोकळे करून काम करायची संधी द्या, हे मी निराशेतून बोललो नव्हतो. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने मैदानात उतरून सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. त्यामुळे कोणाला जर असे वाटले असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात असे बोललो तर ते सत्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काल मी फडणवीसांचे भाषण ऐकले. ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या. ईडी, सीबीआयशिवाय आमच्यासमोर एक मिनिटदेखील मैदानात दिसणार नाही, असे आव्हान खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.