नवी दिल्ली : ओडिशातल्या खुर्दा येथे एका भाजप उमेदवाराने ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या भाजप उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी मतदानासाठी वेळ लागत होता. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी मशिनची तोडफोड केली.
चिल्काचे भाजप आमदार प्रशांत जगदेव यांना यावेळी भाजपने खुर्दा विधानसभेच्या जागेवरुन मैदानात उतरवले होते. ओडिशामध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. ही घटना शनिवारी बेगुनिया विधानसभा मतदारसंघातल्या बोलागाड विभागातल्या कँरिपटना बूथमध्ये झाली. प्रशांत जगदेव हे आपल्या पत्नीसोबत बूथवर पोहोचले होते. परंतु ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने, त्यांच्यात आणि पीठासीन अधिका-यांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे त्यांनी ईव्हीएम मशिन खाली खेचले आणि ते फुटले.