21.4 C
Latur
Wednesday, March 5, 2025
Homeसोलापूरउजनी धरणात १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

उजनी धरणात १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

सोलापूर : यंदा अलनिनो वादळामुळे पाऊस लांबला आणि तोही कमीच पडला. आता पुढच्या वर्षी सुपरअलनिनोचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जावू शकते. शेतीसाठी सोडलेले पाणी तब्बल दोन महिन्यानंतरही बंद झालेले नाही. त्यामुळे आता शेतीच्या आवर्तनाची शक्यता कमीच असून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्यानंतर पुन्हा कॅनॉलद्वारे शेतीला पाणी सोडताही येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.

सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह उद्योगधंद्यांना उजनीचा मोठा आधार आहे. धाराशिव शहरालाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे उजनीतील पाणीसाठ्यावर संपूर्ण राज्याची नजर असते. यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बहुतेक धरणे १०० टक्के भरली नाहीत.

आता सर्वच धरणांमधील पाणीसाठा ६० टक्क्यांपर्यंत खाली आल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तेवढे पाणी पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उजनी धरणात सध्या १६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असून मृतसाठा ७२.४३ टीएमसी आहे. पण, त्यातही २० टीएमसीपर्यंत गाळ असल्याने आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निकषांनुसार धरणात राखीव पाणीसाठा ठेवावाच लागतो. या सर्व बाबींचा विचार करून पुढच्या दोन-तीन दिवसांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कालवा सल्लागार समितीची ऑनलाइन बैठक घेणार आहेत. त्यात उजनीतील पाण्याचे ठोस नियोजन होईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.

उजनी धरणातून २०१९ मध्ये उणे ५९ टक्क्यांपर्यंत पाणी उपसा करण्यात आला होता. त्यावेळी देखील पावसाळ्यात धरण १०० टक्के भरलेले नव्हते. यंदाही तशीच स्थिती असून सुपरअलनिनो मुळे पाऊस पुन्हा लांबला आणि कमीच पडला तर पुढच्या वर्षीची परिस्थिती चिंताजनक असू शकते. त्यामुळे जिल्ह्यात गावोगावी पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर येवू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR