पुणे : वृत्तसंस्था
कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा उठसूट दावा करणे स्वीकारार्ह नसल्याची भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहजीवन व्याख्यानमालेत विषद केली. काही हिंदू नेत्यांच्या आक्रमकतेमुळे देशाची बदनामी होत असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सरसंघचालक बोलत होते. काही स्वयंघोषित हिंदूंनी अनावश्यक हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण करणे टाळावे. हिंदू परंपरेने उदार आणि सहिष्णू आहेत. आपल्या या परंपरेला धक्का पोहोचेल असा कोणताही वाद निर्माण करणे आपण आता टाळले पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र मोहन भागवत यांच्या या विधानानंतर हिंदू संघटनांमध्ये खळबळ माजली आहे.
प्रत्येक मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा करणा-यांना अस वाटते की, भागवत आपला प्रचार उधळून लावत आहेत. पण अशा कृतींनी हिंदू समाज किती काळ आपली ताकद टिकवून ठेवणार हा खरा प्रश्न आहे. जगभरात हिंदूंनी आपली सद्भावनेची प्रतिमा कायम ठेवली पाहिजे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी एकाप्रकारे स्पष्ट केले.
मुघल औरंगजेबाने निरंकुश पद्धतीने राज्य केले तरी त्याचा वंशज बहादुर शाह जफर याने गोहत्येवर बंदी घातली होती, असे विधान डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील हिंदू सद्भावना समारोहात केले. इथेच कधीच कोणाला परके समजले जात नाही आणि हेच हिंदूंचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या भाषणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
धर्माच्या अस्मितेतून अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाली. त्या मंदिराशी कोट्यवधी हिंदूच्या भावना जोडलेल्या होत्या. राम मंदिराची निर्मिती व्हावे असे हिंदूंना वाटत होते, ते हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मात्र, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोण हिंदूंचा नेता होत नाही, असे विधान सरसंघचालकांनी केले.