उदगीर : प्रतिनिधी
उदगीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे या भागाचे आमदार व माजी मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करून उदगीरच्या विकासाला चालना देऊन दळणवळणासाठी मागील ५ वर्षात रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. उदगीर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत असल्याने शहराच्या बाहेरून मंजूर करण्यात आलेला रिंगरोड व देगलूर हा महत्वाचा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माजी क्रीडामंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी नागपूर येथे भेट घेऊन विनंती केली.
आ.संजय बनसोडे यांनी या रस्त्यांसाठी वेळोवेळी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी उदगीर शहराबाहेरील १४० कोटींचा रिंगरोड व उदगीर – देगलूर या रस्त्यासाठी ८१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून तशा सूचनाही संबंधित अधिका-यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. रिंगरोडमुळे उदगीर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार असून दोन जिल्ह्यांना जोडणारा उदगीर- रावी- देगलूर हा अत्यंत महत्वाचा रस्ताही होणार आहे. उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात मोठी रहदारी व वाहतूक असते.
या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे देगलूर, निजामाबाद, मुक्रमबाद, करडखेल, मरखेल, बिलोली, मुखेड, रावी, हाळणी व इतर भागातून नागरिकांची वर्दळ असायची मात्र देगलूरहून उदगीरला ये-जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती.