पुणे : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी वैष्णवीला न्याय मिळवून देऊ, काहीही काळजी करू नका, असा धीर आणि विश्वास कस्पटे कुटुंबीयांना दिला.
दरम्यान, वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. राज्य महिला आयोग आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अनेकांकडून टीका केली जात आहे.
फोनवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वैष्णवीबाबत झालेली घटना दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्यासोबत आहे. या प्रकरणात आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू तुम्ही काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ.
पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचा वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिला.