25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीय विशेषउद्योगविश्वाचा मुकुटमणी

उद्योगविश्वाचा मुकुटमणी

भारतात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमता आजही मोठ्या प्रमाणावर आहे. देश उभा करण्यामध्ये अनेकांचे हात कामी आलेले आहेत. भांडवलदार आणि कष्टकरी या दोघांच्या मदतीने देश घडत असतो मात्र तरीसुद्धा श्रमकरी आणि उद्योगपती यांच्यामध्ये दुरावा कायम असतो. याचे कारण प्रत्येक उद्योगपती हा शोषक असतो असे मानले जाते. त्याला केवळ नफा हवा असतो. त्यामुळे शोषण हा स्थायीभाव मानला जातो. श्रमकरी वर्गात आपल्या श्रमाच्या घामावर हे सारे फुलते आहे अशी धारणा असते.

त्यामुळे उद्योग कोणताही असला तरी संघर्ष हा नेहमीच ठरलेला असतो. मात्र भारतीय उद्योगक्षेत्रात गेली काही दशके नेतृत्व करणारे टाटा सन्सचे संस्थापक रतन टाटा हे काही वेगळेच रसायन म्हणायला हवे. सामाजिक भान, नितांत राष्ट्रप्रेम हृदयी जोपासणारे, संवेदनशीलतेसाठी अंत:करणात जागा ठेवणारे, दातृत्वासाठी सदैव तत्पर असणारे उद्योगपती म्हणून त्यांची ओळख भारतासह जगाला आहे. त्यांचा प्रवास एका मर्यादित कोषापुरता मर्यादित राहिला नाही. त्यामुळे उद्योगक्षेत्राबरोबर जगभरात त्यांच्या माणूसपणाची उंचीही कायम राहिली. उद्योगपती असूनही टाटांविषयी प्रत्येक भारतीयाला प्रेमच वाटते आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरात ज्या भावना आहेत त्यामागे त्यांच्या विचारांच्या वाटेचे प्रतिबिंब आहे. साधारणपणे उद्योजक आणि सामान्य जनता यांचे तसे फारसे नाते नसते. मात्र त्याला रतन टाटा हे अपवाद ठरले असेच म्हणावे लागेल. त्यांच्याविषयीच्या प्रेमभावनेचे जे दर्शन घडते आहे त्यामागे त्यांनी पेरलेल्या प्रेमभावनेचा विचार आहे. टाटांनी आपल्या उद्योगविश्वात जशी माणसं जपली तशी ती जपताना मूल्यांची धारणा देखील कायम ठेवली.

आज प्रत्येक भारतीयाच्या मनात टाटा आणि टाटांचे उत्पादन यांची विश्वासार्हता प्रचंड आहे. उत्पादन टाटांचे आहे म्हणजे ते गुणवत्तेचेच असणार हा विश्वास बाजारपेठेत सहजतेने मिळालेला नाही. त्यासाठी गेली अनेक दशके या उद्योगसमूहाचे नेतृत्व करणा-या टाटांनी विचाराची पेरणी केलेली आहे. विश्वासार्हता ही कोणत्याही व्यक्तीची अथवा उद्योगाची सर्वांत मोठी संपत्ती असते. जगप्रसिद्ध विचारवंत ओशो यांनी म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची परिपक्वता आपल्या आतील प्रवासाशी व अनुभवाशी संबंधित असते. तुम्ही जितका तळ गाठाल, स्वत:ला अत्यंत आत्मशोधकतेने व अंतर्मुखतेने जाणून घ्याल जेवढे अधिक परिपक्व होत जाल, तेवढा तुमच्यातला मी, अहं अदृश्य होत जाईल. मग उरेल तो फक्त समजूतदारपणा, नि:शब्द शांतता आणि निरागसता. टाटांच्या परिपक्वतेत त्यांच्या अनुभवाची समृद्धता होती.

टाटांच्या जीवनव्यवहारात दिसणारा विचार हा त्यांच्या आजवरच्या जीवनतत्त्वज्ञानाचा प्रवास होता. त्यांच्या जगण्यात असलेला साधेपणा हा जगाच्या डोळ्यात भरणारा होता. त्यामागे त्यांची विचाराची परिपक्वता हेच कारण आहे. भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी म्हणून केला जाणारा गौरव रतन टाटांनी अपार मेहनतीने निर्माण केला आहे. आज समाजमनात आदराने नतमस्तक व्हावे अशी फार थोडी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात दिसताहेत. जीवन आणि विचार, मूल्ये यांची वाट एकच असणारी ती माणसं असतात. अशा अनेक माणसांपैकी रतन टाटा एक होते. याचा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्या सर्वांनीच याविषयी भरभरून लिहिले आहे.
रतन टाटा उद्योगविश्वातील सचोटी, प्रामाणिकपणा, मूल्यनिष्ठा, तत्त्वनिष्ठा यांचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा गर्व कधीच केला नाही. सामान्य कर्मचा-याशी देखील त्यांनी माणूसपणाच्या उंचीवरचा व्यवहार केला.

एका सर्वेक्षणात रतन टाटांचा मनावर प्रभाव असणारी अधिक माणसं होती. याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा करण्यात आला तेव्हा त्याचे कारण होते की, ते जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असूनही त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक नव्हते. आपले काम आपण करायचे, यासाठी त्यांनी सतत पाऊलवाट चालण्याचा प्रयत्न केला. श्रीमंतीमुळे अंतर वाढणार नाही याची त्यांनी सतत काळजी घेतली. ही वाट चालणे नेहमीच सर्वांना जमते असे होत नाही. लोक काम करतात आणि अधिकार आले की आपले माणूसपणाचे भान विसरतात; मात्र टाटांनी ते साधेपणाचे शिवधनुष्य लीलया पेलले. त्यांनी आपल्या उद्योगसमूहात कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी असा भेद न करता सर्वांनाच सन्मानाची वागणूक दिली आहे. टाटांच्या जीवन व्यवहारासंबंधी सांगितलेले किस्से आपण ऐकले की, त्यांच्यात श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन नव्हतेच, मात्र सतत माणूसपणाचे दर्शन घडत होते. त्यांना श्रीमंतीचा मुळात सोस नव्हता आणि कोणाचे शोषण करून त्यांना श्रीमंतीचा विक्रमही स्थापन करायचा नव्हता.

त्यामुळे ते सामान्य स्वरूपाचेच जगणे पसंत करत गेले. त्यांनी टाटा समूहाचे चेअरमन म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हा देखील त्यांनी मूळच्या चेअरमन असलेल्या जेआरडींच्या कार्यालयात न बसता स्वत: छोट्याशा खोलीतून कारभार करणे पसंत केले. टाटांनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. हवे तर गोळी घाला पण आपण आपले तत्त्व सोडणार नाही, हा विचार म्हणजे आपल्या तत्त्व, मूल्यांवरील त्यांची निष्ठा होती. वेळेचे पालन करण्यात अत्यंत पक्के असलेले टाटा शेवटपर्यंत वक्तशीर राहिले. आपण जी वेळ दिली ती पाळायचा कसोशीने प्रयत्न करायचे. आज सामान्य माणूस वेळ पाळताना फारशी चिंता करत नाही. वेळ पाळणे अनेकांच्या हिशेबी नसते पण हा महान माणूस जीवनात शिस्तप्रिय होता. अशा वाटांचा प्रवास खरंच किती लोकांना जमत असतो, याचाही विचार करण्याची गरज आहे. म्हणून जगभरातील जाणा-या सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी त्यांची भेट म्हणजे प्रेरणेचाच प्रवास होता. त्याचबरोबर सामान्यांसारखे जगणे ही सुध्दा आदर्शाची वाट होती. जे जे लोक टाटांना भेटले त्या सर्वांनीच आपल्याला अफाट ऊर्जा मिळाली असल्याचे नमूद केले. एका अर्थाने टाटा म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्रोत होता.

सामान्य माणसांवर प्रेम करणारे टाटा प्राणिमात्रांवर देखील प्रेम करत होते. त्यांना कुत्रे फार आवडत असत. रतन टाटा यांना समाजसेवेसाठी लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार ब्रिटनमध्ये प्रदान केला जाणार होता. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अगोदर काही तास आपण कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही असे कळवले होते. याचे कारण होते की, टीटो हा त्यांचा कुत्रा आजारी पडला आहे. आपल्या कुत्र्यावरील प्रेमापोटी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी देखील उपस्थित न राहाणा-या टाटांची ही भूतदया म्हणजे माणूस आणि प्राणी प्रेमाच्या सर्वोच्च स्थानावरील दर्शन होते. त्यांनीच स्वत:विषयी म्हटले आहे की, मी माझ्या खासगीपणाला अधिक महत्त्वाचे मानतो. मात्र याचा अर्थ समाजापासून फटकून राहणारा आहे असा देखील नाही. समाजावर संकटे आली तेव्हा त्यांनी धाऊन जात मदतीचा हात दिला आहे. भारतात कोरोनाचे संकट घोंघावत असताना अवघे जग शांत झाले होते. संपूर्ण जग आर्थिक संकटात सापडले होते. सरकारही आर्थिक अडचणीचा सामना करत होते. त्यावेळी रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टकडून ५०० कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांकडून १००० कोटी रुपयांची मदत जाहीर करून माणूसपणाचे दर्शन घडवले होते. कोरोनाच्या काळात त्यांनी मुक्तहस्ते केलेली मदत आजही अनेकांच्या आठवणीत कायम असेल. कर्मचा-यांच्या बाबतीत देखील त्यांनी घेतलेली भूमिका कितीतरी कौतुकास्पद म्हणायला हवी.

त्यांच्या प्रत्येक निर्णयात माणूसपण केंद्रस्थानी होते हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना कोणतेही काम करताना लाज वाटली नाही. मात्र आपल्या तत्त्वाशी तडजोड करायची नाही हे त्यांनी जीवनभर पाळलेले तत्त्वज्ञान वर्तमानात सर्वांसाठी आदर्शवतच म्हणायला हवे. आपले काम आपण करायचे. कोणत्याही कामासाठी त्यांना विनाकारण मदतनीसांची गरज पडत नसायची. हा विचार करणारी माणसं आज आपल्या भोवती दिसत नाहीत.
जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पहात उंच भरारी घेणारा उद्योगपती म्हणून टाटांकडे पाहिले जाते. अशा प्रकारचे स्वप्न पाहणे वेगळे आणि त्यासाठी जमिनीवर राहून विचार करणे वेगळे हे लक्षात घ्यायला हवे. जमशेदपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य कर्मचा-याप्रमाणे गणवेश घालून आपल्या व्यावहारिक आयुष्याचा श्रीगणेशा केला होता. अशी वाट चालणारे किती उद्योजक आज आपल्याभोवती आहेत? अशा स्वरूपाचे काम केले म्हणून त्यांना कर्मचा-यांच्या श्रमाचे मोल ज्ञात होते.

स्वप्न पाहिले, कष्ट केले, कल्पनांची भरारी घेतली आणि सतत नव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच ज्या कंपनीची उलाढाल फक्त ६० लाख रुपयांची होती त्या कंपनीची भविष्यातील प्रगती अचंबित करणारी ठरते. रतन टाटा हे टाटा समूहाचे १९९१ ते २०१२ आणि २०१६ ते २०१७ या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून माघार घेतली तरी ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले होते. मुळात त्यांच्या सामाजिक जाणीवा प्रचंड खोल होत्या. टाटा यांनी कॉर्नेलला ५० दशलक्ष डॉलरची भेट दिली. ते विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार होते. टाटा उद्योगसमूहांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता अधिकाधिक उंचावण्याचे काम रतन टाटांनी केले होते. याचे कारण स्वत: टाटाच माणसांच्या विश्वासाला अधिक महत्त्व देत होते.

– संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ-विचारवंत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR