यंदा मार्च ते मे महिन्यात उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या तीन महिन्यांत देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात अल निनो परिस्थितीमुळे दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशात उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांची संख्याही सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या हंगामात देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढेल. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मार्च ते मे या कालावधीतील हवामान अंदाजाची माहिती दिली.
होळीनंतर उत्तर आणि मध्य प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव दिसून येऊ शकतो. दक्षिण भारतात दोन आठवड्यांपासून तापमानात वाढ होत आहे. गत दोन वर्षांपासून फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यापासून तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले. पॅसिफिक महासागरात अल निनो स्थिती सक्रिय होण्यास गतवर्षी सुरुवात झाली होती. ही स्थिती मे पर्यंत कायम राहण्याचा अंदाज जागतिक स्तरावर वर्तविण्यात आला होता. त्यानुसार आता अल निनोची तीव्रता कमी होऊ लागली आहे. अल निनो मोसमी पावसाच्या सुरुवातीला संपुष्टात येईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अल निनोची तीव्रता कमी होत असली तरी त्याचा परिणाम तापमान वाढण्यावर होणार आहे. त्यामुळे मार्च ते मे या कालावधीत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिणेतील तेलंगणासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. उत्तर भारत, मध्य भारतासह राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळांचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. काही काळासाठी सरासरीपेक्षा उच्च तापमानाचा कालावधी म्हणजे उष्णतेची लाट. दरवर्षी राज्यात विदर्भाला हा फटका अधिक बसतो. उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका देशाच्या उत्तर-पश्चिम भागाला बसतो. उष्णतेच्या लाटा सर्वसाधारणपणे मार्च ते जून दरम्यान निर्माण होतात. अपवादात्मक स्थितीत जुलैपर्यंत उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे संबंधित प्रदेशांमध्ये राहणा-या लोकांवर, पिकांवर प्रतिकूल परिणाम होतो. यंदा महाराष्ट्रालाही सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागणार आहे. किनारपट्टीसह राज्याच्या सर्वच भागात तापमानवाढ होईल असा अंदाज आहे.
उष्णतेच्या झळा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला बसण्याचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याला आतापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई दृष्टिपथात आहे. फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जलस्रोतांनी तळ गाठला आहे. अशा स्थितीत धरणातील पाणीसाठा किती दिवस टिकेल ते सांगता येत नाही. अहमदपूर तालुक्यात टेंभुर्णी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ४५ जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. हळूहळू अन्य तालुक्यांतही हीच परिस्थिती उद्भवणार आहे. लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या शहरात सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो, लवकरच हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईबरोबरच चाराटंचाईही जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर होणा-या चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात चारा-पाण्याविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली. कोणत्याही टंचाईची ओरड माणसाला करता येते, मुक्या जीवांनी काय करायचे? यंदा एल निनोमुळे पाऊसमान बिघडले. उत्तर भारत वगळता पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तसाच प्रकार उन्हाळ्यात होईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मार्चमध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशभरात मार्चमध्ये साधारणत: ३० मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा मार्चमध्ये सरासरीच्या ११७ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाबरोबरच मार्चमध्ये पाराही चाळिशी ओलांडण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा परिणाम पीक उत्पादनावरही झाला आहे.
अल निनोमुळे यंदा राज्यातून थंडी लवकर गायब झाली. त्याचा परिणाम रबी पिकावर झाला. हुरड्यावर आलेली पिके अपेक्षेपेक्षा लवकर काढणीस आली. मागास कांदा लागवड, गहू पिकाला हे वातावरण मारक ठरले. त्यामुळे या पिकांना कमी उतारा मिळण्याची शक्यता आहे. ज्वारी, हरभरा व गहू पिकाला मात्र लवकर थंडी नाहिशी होण्याचा परिणाम जाणवला नाही. यंदा महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटा छळणार असल्या तरी ईशान्य भारत, पश्चिम हिमालय क्षेत्र, दक्षिणेकडील राज्यांचा काही भाग तसेच पश्चिम किना-यावर तुलनेने कमी तापमान राहणार आहे. हवामान विभागाच्या इतिहासात २०२३ हे वर्ष सर्वाधिक तापमानाचे ठरले. महाराष्ट्राला सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागणार असला तरी मराठवाड्याच्या ते पाचवीला पूजले आहे. उष्णतेच्या झळांचा फटका भाजीपाला, फळपिकांना बसणार आहे. परिणामी महागाईच्या भस्मासुराला सामोरे जावे लागणार!