25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री पवारांचे धनंजय मुंडेंना अभय

उपमुख्यमंत्री पवारांचे धनंजय मुंडेंना अभय

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत स्थान
मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी जोर लावून धरली आहे. पण राजीनामा घेण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पक्षाच्या कोअर समितीमध्ये स्थान देऊन अभय दिले आहे. दुसरीकडे नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोअर कमिटीमध्ये स्थान देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज सात प्रमुख नेत्यांची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. यात कोअर कमिटीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश केला आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंडे यांच्यावर बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह विविध गैरव्यवहाराबाबत आरोप होत आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेणार अशी चर्चा होती.

पण राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मुंडेंची पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडेंवर कितीही आरोप होऊ द्या, पण जोपर्यंत मुंडे दोषी आढळत नाहीत, तोपर्यंत राजीनामा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे मुंडेंचे मंत्रिपद कायम शाबूत तर राहिलेच. पण आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील कोअर कमिटीत स्थान देऊन त्यांचे पक्षात स्थान अधिक बळकट केले आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

भुजबळांची नाराजी दूर होणार?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्यांनी थेट पक्ष नेत्यांवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले जातात माहित नाही ते लादले जातात, अशी जहरी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र, आता त्यांना कोअर कमिटीत स्थान दिले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR