लातूर : प्रतिनिधी
धनगर समाज अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लातूरच्या पु. अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत उपोषण करीत असलेल्या दोघांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी सहावा दिवस होता. तरीही शासन या उपोषणाची दखल घेत नाही. हे पाहूण सकल धनगर समाजाच्या वतीने आज दि. ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता पु. अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
उपरोक्त मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेले चंद्रकांत हजारे व अनिल गोयेकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी सहावा दिवस होता. दरम्यान शासनाच्या वतीने वरिष्ठ पातळीवरुन अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. दरम्यान महाराष्ट्र व जिल्ह्यातील अनेक धनगर समाज, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते, नेते यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे. या उपोषणाची शासन दखल घेत नसल्यामुळे आज लातूर जिल्हा, बीड जिल्ह्यातील काही भागांतून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.