नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या देशात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. उसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम या दरांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या हंगामात उसापासून इथेनॉल बनवता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले.
आज जारी केलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनासाठी उसाचा रस वापरण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा झटका बसला आहे. देशातील साखरेचे उत्पादन पाहता हा निर्णय घेण्यात आला. खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सर्व साखर कारखाने आणि डिस्ट्रिलरीज यांना यासंदर्भात तातडीने इथेनॉलच्या उत्पादनासाठी उसाचा वापर करू नये, असे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर साखर उत्पादनाशी संबंधिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.
याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील साखरेचे उत्पादन, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवतो. ज्यामुळे स्थिर किमतीवर साखरेची उपलब्धता सुनिश्चित होते. सरकारने २०२३-२४ या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नय,े असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. परंतु बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. या निर्णयाबाबत मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयालाही कळवले आहे.
कारखान्यांसाठी मोठा धक्का
सरकारचा हा निर्णय साखर कारखान्यांसाठी मोठा झटका मानला जातो. कारण त्यांचे ८० टक्के उत्पन्न इथेनॉलपासून येते. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या मते २०२३-२४ मध्ये उत्पादन ८ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरात घसरण
भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते, अशा बातम्या येताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे ८ टक्क्यांनी घसरले. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.