कोलकाता : वृत्तसंस्था
मंगळवारी रात्री कोलकात्यातील फलपट्टी मच्छुआ भागातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आली आहे. २२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. काही लोक अजूनही आत अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, सध्या उन्हाळा सुरू असल्याने आगीच्या दुर्घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच दरम्यान, कोलकाता येथील हॉटेल ऋतुराजला भीषण आग लागली असून या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर पोलिस आयुक्त मनोज वर्मा म्हणाले की, रात्री सव्वा आठ वाजता ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, अनेक लोक जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून आणि खिडक्यांमधून उड्या मारताना दिसले.