28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रएआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादन वाढणार

एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादन वाढणार

पुणे : प्रतिनिधी
ऊसाचे पीक कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमी हेक्टरमध्ये ऊसाचे अतिरीक्त उत्पादन घेऊ शकतो,हे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.शेतक-यांनी हे तंत्रज्ञान शेतात अवलंबल्यास येत्या ३-४ वर्षात एआयच्या वापरामुळे ऊस उत्पादनासह अर्थकारणात क्रांतीकारक बदल होतील,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विस्माचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, उद्योजक प्रतापराव पवार,साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील आदी उपस्थित होते.बारामती जवळील कृषी विज्ञान केंद्रात ऊसाची प्रात्यक्षिक पाहणी करून एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.ऊस उत्पादनामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी येणा-या खर्चातील खारीचा वाटा म्हणून विस्मातर्फे ११ लाख रूपयांची देणगी जाहीर करण्यात आली.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन एकरी खर्च कमी करुन ऊस उत्पादन वाढविण्यासाठी अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड यासारख्या जागतिक संस्थांच्या मदतीने प्रयोग केले असून ते यशस्वी झाले आहेत.कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याची सुरुवात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने सुरू झाली असून त्याचा लाभ राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस उत्पादकांना व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .कार्यशाळेत कृत्रिम बुध्दिमत्तेसंदर्भात अमेरिका आर्यलँड, इंग्लंड व दुबई येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शंभर पेक्षा अधिक प्रतींनिधी उपस्थित आहेत.

जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की,ऊस क्षेत्रात संशोधन करणा-या संस्था,राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र येऊन धोरणात्मक पातळीवर निर्णय घेणे आवश्यक आहे.जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान आता ऊस शेतीमध्ये आणत असून जमिनीची सुपिकता वाढवणे,रोगांचे नियंत्रण करणे,ऊसाचे उत्पादन आणि ऊसाची रिकव्हरी वाढवणे आदी घटकांवर काम करणे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार आहे. या कार्यशाळेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक प्रतापराव पवार यांनी स्वागत केले.

१५० दिवस कारखाना सुरू राहणे अपेक्षित : ठोंबरे
विस्माचे अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की,अलीकडचा साखर कारखाना उद्योग हा संकटात आला असून निदान १५० दिवस कारखाना सुरू राहणे अपेक्षित असताना ९० दिवसातच कामकाज ठप्प होत आहे.कारखान्यातील काम थांबले तरी ३६५ दिवसांचा पगार तसेच व्यवस्थापन आणि देखभाल खर्च कारखान्यांना करावाच लागतो. संशोधन संस्थांनी एकत्र येऊन टास्क फोर्सची स्थापना करणे आवश्यक आहे.एआय तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केल्यानंतर एकदम चित्र पालटणार नसले तरी ऊस शेती आणि साखर कारखान्यांशी संबंधित अडचणींवर कृत्रिम बुद्धीमत्ता हा मार्ग दाखवणारा आशेचा किरण असेल,ऊस उत्पादनाकडे साखर कारखानदारांनी गांभीर्याने पाहण्याची वेळ आली असून ऊस विकासासाठी कारखानदारांनी निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.

साखर उद्योग सशक्त होईल : सुप्रिया सुळे
एआयमुळे साखर उद्योग सशक्त होईल असे नमूद करून ते म्हणाले ऊस उद्योग क्षेत्रात खासगी कारखानदारी वाढत असून ५० ते ५२ टक्के त्यांचा वाटा आहे. साखर कारखानदारांची क्षमता वाढत असली तरी प्रती एकरी उत्पन्न वाढत नाही,ही चिंतेची बाब आहे.ऊसापासून घेण्यात येणा-या पर्यायी उत्पादनांसाठी देखील कच्चा माल उपलब्ध होत नाही,ऊस शेतीतील अडचणी लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकरी आता केळी या पर्यायी उत्पादनाकडे वळू लागले आहेत,ही चिंतेची बाब आहे.असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR