29.9 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeउद्योगएकट्या अमेरिकेला पाठवले १०.६ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन!

एकट्या अमेरिकेला पाठवले १०.६ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन!

निर्यातीत पेट्रोलियम पदार्थ, हिरे पिछाडीवर; नेदरलँडला २.२ अब्ज तर इटलीला १.२६ अब्ज डॉलर निर्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील तीन वर्षांत अमेरिकेला भारताची स्मार्टफोन निर्यात तब्बल पाचपटींनी वाढली आहे. या कालावधीत जपानला निर्यात चारपट झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. स्मार्टफोन निर्यातीने देशातून होणा-या पेट्रोलियम उत्पादन आणि हिरे यांच्या निर्यातीलाही आता मागे टाकले.

२०२४-२५ मध्ये स्मार्टफोन निर्यातीचे मूल्य ५५ टक्क्यांच्या वाढीसह २४.१४ अब्ज डॉलरवर पोहोचले. २०२३-२४ मध्ये ही निर्यात १५.५७ अब्ज डॉलर तर २०२२-२३ मध्ये १०.९६ अब्ज डॉलर इतकी होती. एकट्या अमेरिकेलाच २०२४-२५ मध्ये १०.६ अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले, या मोठ्या वाढीमुळे ‘स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात करणारा उत्पादक देश’ म्हणून भारताचे नाव पुढे आले आहे.

नेदरलँडला झालेल्या स्मार्टफोनची निर्यात २०२२-२३ मधील १.०७ अब्ज डॉलरवरून २०२४-२५ मध्ये २.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. इटलीला निर्यात ७२ कोटी डॉलरवरून वाढून १.२६ अब्ज डॉलरवर पोहोचली.

अधिका-याने सांगितले की, मागील ३ वर्षांत या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे देश एक प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र आणि ग्राहक केंद्रात परिवर्तित झाला आहे. या वाढीव उत्पादनात उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा विशेष वाटा आहे.

या योजनेमुळे जिथे गुंतवणूक वाढली आहे. तिथे स्थानिक उत्पादनालाही चालना मिळाली आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताची जागा आता अधिक मजबूत झाली आहे.

मागील आर्थिक वर्षात अमेरिका, नेदरलँड, इटली, जपान आणि झेक प्रजासत्ताक या पाच देशांमध्ये स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR