35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांच्या ३ महत्त्वाकांक्षी योजना बंद!

एकनाथ शिंदे यांच्या ३ महत्त्वाकांक्षी योजना बंद!

मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या योजना आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनांसाठी निधी दिला नसल्याने त्या बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनांमध्ये आनंदाचा शिधा, १० रुपयांची शिवभोजन थाळी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यांचा समावेश आहे.

शिंदे सरकारच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने त्यांचा आढावा घेतला आणि राज्याच्या आर्थिक तिजोरीवर होणारा ताण पाहता त्या केवळ कागदावर राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषत: आनंदाचा शिधा योजना, जी दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि शिवजयंती अशा प्रमुख सणांच्या वेळी लागू केली जात होती, तिला यंदा निधी मिळालेला नाही.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली १० रुपयांची शिवभोजन थाळी योजना एकनाथ शिंदे सरकारने पुढे चालू ठेवली होती. मात्र, या योजनेसाठीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजना देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ती बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला आणि शेतकरी योजनांना मात्र निधी :
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि शेतक-यांसाठी मोफत वीज योजना या योजना मात्र सुरू राहणार आहेत. या योजनांना सरकारने आवश्यक निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या सुविधा महिलांसाठी आणि शेतक-यांसाठी कायम राहणार आहेत.

विरोधक आक्रमक
शिंदे सरकारच्या योजनांना निधी मिळत नसल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यांच्यात जोरदार टोकाचे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR