मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणा-यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मुंबईतल्या जवळपास ७ ते ८ पोलिस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलिस, जेजे मार्ग पोलिस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरू आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलिस कसून चौकशी करत आहेत.
एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.