पिंपरी : वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आजच्या काळात सुनेला मारहाण होणे, पैशांची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. आताच्या काळामध्ये अशी मानसिकता चांगली नाही.
सून आपल्या मुलीसारखीच आहे. लाडकी बहीण, लाडकी मुलगी अशा पद्धतीने लाडकी सून देखील मानली पाहिजे. तशी मानसिकता केली पाहिजे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिस सखोल तपास करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना आदेश दिले आहेत. अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. तपासात त्रुटी राहणार नाहीत.
‘फास्ट ट्रॅक’साठी प्रयत्न : पंकजा मुंडे
वैष्णवीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. ज्यांनी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल. ही केस ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालायला पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. वाकड येथे शनिवारी मंत्री मुंडे यांनी कस्पटे कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
रामदास आठवले, करुणा मुंडे यांनीही केले सांत्वन
वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी शनिवारी रामदास आठवले, करुणा शर्मा-मुंडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रीटा गुप्ता यांनीही वाकड येथे भेट दिली. कस्पटे कुटुंबियांकडून घटना जाणून घेत संवेदना व्यक्त केल्या.