16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरएमपीएससीची गुणवत्ता यादी २३ महिन्यांपासून लालफितीत..!

एमपीएससीची गुणवत्ता यादी २३ महिन्यांपासून लालफितीत..!

लातूर : प्रतिनिधी
आयोगाच्या वतीने (एमपीएससी) ८ हजार १६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक  व कर सहायक पदाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले १५ हजारांवर उमेदवार अद्यापही प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी टंकलेखन कौशल्य चाचणी झाली होती. यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आल्याने गुणवत्ता यादी रखडल्याचे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी दोन वर्षांपासून परीक्षा, निवड यादी आणि त्यानंतर नियुक्तीच्या अपेक्षेत असणा-या तब्बल १५ हजारांवर उमेदवारांची चिंता वाढली आहे.
‘एमपीएससी’ने जानेवारी २०२३ मध्ये संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षांच्या एकूण ८१६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यात लिपिक टंकलेखक पदाची जवळपास ७००७ आणि कर सहायकची ४६८ पदे होती. यासाठी ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ ला पार पडली. यानंतर लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान घेण्यात आली. यातील उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक- टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही प्रलंबित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR