33.4 C
Latur
Monday, May 19, 2025
HomeUncategorizedएस. टी.च्या ताफ्यात येणार स्मार्ट बस

एस. टी.च्या ताफ्यात येणार स्मार्ट बस

कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडीसह सर्व सुविधा असणार

मुंबई : प्रतिनिधी
एस. टी. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या स्मार्ट बसेस लवकरच एस. टी.च्या ताफ्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी दिली. या बसेसमध्ये कॅमेरे, जी. पी. एस. तंत्रज्ञान, एल. ई. डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अ‍ॅनालाइज यंत्रणा लावण्यात येणार आहे.

एस. टी.च्या ताफ्यात लवकरच नव्या ३ हजार बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत बोलताना सरनाईक यांनी स्मार्ट बसविषयी माहिती दिली. नवीन लालपरीसह येणा-या सर्व बसेसमध्ये ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी. पी. एस. तंत्रज्ञान, एल. ई. डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अ‍ॅनालाइज यंत्रणा या बरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.

स्वारगेट बस स्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला या पुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरदेखील या कॅमे-याचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बस स्थानक आणि परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेसदेखील पूर्णत: बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR